शेंदुर्णी प्रतिनीधी । येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप.सोसायटीच्या अप्पासाहेब र भा गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेने पुणे येथील सीसीए एज्युकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन एक दिवसीय भाग बाजार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला सीसीए एज्युकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि भागबाजार विश्लेषक तुषार पाटील आणि प्रमुख विद्यार्थी समुपदेशक पूजा गावंडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले तर कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव र. पाटील हे होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यशाळा आयोजना मागची भूमिका, महाविद्यालयातील वाणिज्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम, भागबाजार प्रशिक्षण विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टिकोनातून असलेले महत्व, इ. घटक विशद केलेत. तर, कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक तुषार पाटील यांनी शेअर, शेअर्सचे प्रकार, भागबाजार, भागबाजाराचे प्रकार, गुंतवणूक, गुंतवणूकिचे प्रकार, पैसा, भांडवलाचे प्रकार, भांडवल बाजार, नाणे बाजार, प्राथमिक भागबाजार, दुय्यम भागबाजार, भागबाजाराचा इतिहास, आयपीओ, बीएसई सेन्सेक्स, निफ्टी फिफ्टी, देशातील प्रमुख भागबाजार, भागबाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंड इ. घटक अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा पद्धतीने विशद केलेत याबरोबरच भागबाजाराचे, भांडवल बाजाराचे अर्थव्यवस्था विकासातील महत्व, विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, इ. बाबी श्री पाटील यांनी विस्तृतपणे समजून सांगितल्या. यानंतर सीसीए एज्युकेशन्सच्या विद्यार्थी समुपदेशक पूजा गावंडे यांनी भागबाजार, भागबाजाराच्या माध्यमातून उपलब्ध रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून उपलब्ध अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याकार्यशाळेचे आयोजन आणि संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. श्याम साळुंखे यांनी केले, त्यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले आणि त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना शेअरबाजार प्रशिक्षणाची गरज, समाजात असलेले समज-गैरसमज दूर करण्याच्यादृष्टीने असलेले कार्यशाळेचे महत्व विशद केले. याकार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. श्याम साळुंखे यांनी तर आभार डॉ. सुजाता पाटील यांनी केले. कार्यशाळेस विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल चेअरमन संजय गरुड, सचिव मा. सतिश काशिद, सहसचिव दिपक गरुड सर्व संस्था पदाधिकारी यांनी प्राचार्य डॉ. वासुदेव र. पाटील, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.