मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फोन टॅपींग प्रकरणातील चौकशीसाठी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती मध्यंतरी उघड झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या दोन्ही मान्यवरांचे फोन टॅप करण्यात आले तेव्हा खडसे हे भाजपमध्ये असले तरी ते फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेत होते. तर, संजय राऊत हे महाविकास आघाडी सरकार आकारास आणण्याच्या तयारीत असतांनाच त्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
या प्रकरणी कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज जबाब नोंदविण्यात आला आहे. एकीकडे ईडी आणि सीबीआयसह अन्य केंद्रीय यंत्रणा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई करत असतांना राज्य सरकारही आता प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यामुळे आता फोन टॅपींग प्रकरणाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.