मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या २५०० नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून येथील सर्व्हेक्षणाला सुरुवात झालेली आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत गावठाण त्याचप्रमाणे नगरपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या 2011 पूर्वीच्या नागरिकांना दिलासादायक बातमी आहे नगर पंचायत हद्दीत अतिक्रमीत जागांवर राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे घरकुल मिळणार असून त्यांच्या अतिक्रमित जागा ह्या नियमाकुल होणार आहेत. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपंचायती द्वारा अधिकृतरित्या सर्वेक्षणात सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रभाग क्रमांक 14 मधील खदान बर्ड भागापासून झाली आहे.
दरम्यान नगर पंचायत हद्दीत अतिक्रमण व भोगवटा धारक नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल व तत्सम योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याने शहरातील सुमारे २५०० च्या जवळपास वर भोगवटादार असलेल्या नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. ही मोठी अडचण लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या दालनात तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली होती.
शहरातील अतिक्रमित धारकांच्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भात ठराव व इतर कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पुढच्या पालिकेचा मीटिंगमध्ये तहसीलदारांच्या पत्रानुसार शहरातील अतिक्रमित जागा निर्माण करण्यासंदर्भात चा ठराव घेण्यात आला व तद्नंतर या संदर्भातील निविदा प्रक्रिया पार पाडून दि.१७ मार्च २०२२ रोजी युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे या एजंसीला शहरातील अतिक्रमण धारक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या स्वाक्षरीने कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. सदरील एजंसीने मंगळवार दि.१० मे २०२२ पासून प्रभाग क्र.१४ मधील खर्डी परिसरात सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. यानंतर शहरातील इतर ठिकाणचे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने होणार असून शहरातील भोगवटा धारक नागरीकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रभाग क्र.१४ मधील खदान बर्डी भागात शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सविता सुभाष भलभले, युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे एजंसीचे लिंबराज सूर्यवंशी, मिलिंद देवधर, जयवंत पाठक आदीद्वारा सर्वेक्षण मोहीम सुरू झाले आहे.
कार्यारंभ आदेशात म्हटले आहे की,
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नियमानुकूल करण्यासाठी शासकीय अतिक्रमित जमिनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करून भौगोलिक माहिती प्रणाली आधारे GIS नकाशे तयार करणे, तसेच अतिक्रमित क्षेत्रांचा अभिन्यास तयार करणे व नगर रचना विभागाद्वारे प्रमाणित करून नगर पंचायतीकडे सादर करणे. नियमानुकूल झालेले तसेच इतर लाभार्थीचे प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन करणे. असे काम युनिटी जिओ स्पेटीएल एल.एल.पी, कोथरूड पुणे एजन्सीला देण्यात आले आहे.
सर्वेक्षण करतांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन भोगवटा धारकांचे आधार कार्ड झेरॉक्स , जागे संदर्भातील माहिती घेऊन त्या घरावर एक कोड टाकला जात आहे. पुढे हाच कोड संबंधित जागा नियमनकुल करण्यासाठी नागरिकांच्या अर्जावर नमूद केला जाणार असून यासंदर्भातील सर्व माहिती अहवाल नगरपंचायत प्रशासनाला सुपूर्द केला जाणार आहे.
संपूर्ण सर्व्हेक्षण झालेनंतर जिल्हा नियोजन समिती मार्फत जागा मोजणीची रक्कम पालिकेला उपलब्ध केली जाईल व पुढे त्या जागांचे सी टी सर्वे नकाशे व उतारे केली जातील अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय्य सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.