
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशनमध्ये कार्यरत असलेल्या राजेंद्र मुरलीधर पाटील यांना २०१९ मध्ये रस्ता अपघातात गंभीर दुखापत होऊन आयुष्यभराचे अपंगत्व आले. या प्रकरणी मोटार अपघात दावा प्राधिकरणामार्फत अखेर १४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात दोन्ही पक्षांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, पीडित कर्मचाऱ्याला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

३० मे २०१९ रोजी रात्रपाळीसाठी भुसावळहून जळगावकडे जात असताना, नॅशनल हायवे क्र. ६ वरील जय जवान पेट्रोलपंपासमोर राजेंद्र पाटील यांच्या दुचाकीला समोरून रॉंग साईडने आलेल्या मालट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांच्या पायाचा गुडघ्यापासून काप करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आणि रोजच्या आयुष्यावर तसेच उपजीविकेवर त्याचा गंभीर परिणाम झाला.
या घटनेबाबत भुसावळ पोलीस स्टेशनला पिडीताचे बंधू सतीश पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. मालट्रकचा चालक अशिषभाई कल्याणजी (रा. कच्छ, गुजरात) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, संबंधित वाहन जप्त करण्यात आले होते. अपघातानंतर उपचार, औषधे आणि वैद्यकीय खर्चामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने हा खर्च भागवण्यात आला. सुदैवाने, राजेंद्र पाटील हे जैन इरिगेशनमध्ये कायमस्वरुपी नोकरीला असल्यामुळे E.S.I.C. कडून त्यांना वैद्यकीय खर्च आणि अपघातादरम्यान गमावलेला पगार मिळाला.
तथापि, भविष्यकाळातील आर्थिक नुकसान आणि पूर्ण अपंगत्व लक्षात घेऊन त्यांनी ॲड.महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त दावा दाखल केला होता. सुरुवातीला हा दावा भुसावळ न्यायालयात वर्ग करण्यात आला होता, मात्र अर्जदाराच्या विनंतीवरून तो जळगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला. अखेर १३ सप्टेंबर २०२५ रोजी हा दावा लोकन्यायालयात वर्ग करण्यात आला.
लोकन्यायालयात झालेल्या चर्चेदरम्यान अर्जदाराचे वकील ॲड.महेंद्र चौधरी, विमा कंपनी HDI Magma General Insurance Co. Ltd. चे वकील ॲड.अक्षय पिंगळे यांच्यात चर्चेअंती १४ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईवर सहमती झाली. ही रक्कम मे. पॅनलचे अध्यक्ष एम. एस. बढे यांच्या समोर अधिकृतपणे मंजूर करण्यात आली. नुकसानभरपाई मंजूर झाल्याने अर्जदाराने समाधान व्यक्त केले असून, आर्थिकदृष्ट्या त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या दाव्यात ॲड.महेंद्र सोमा चौधरी, ॲड.श्रेयस चौधरी, ॲड.हेमंत रामदास जाधव आणि ॲड.सुनील तुकाराम चव्हाण यांनी यशस्वीपणे काम पाहिले. लोकन्यायालयाच्या माध्यमातून अल्प वेळात निर्णय मिळाल्याने “तारीख पे तारीख” अशा विलंबाच्या प्रक्रिया टाळता आल्या आणि पीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.



