पाचोरा येथे घाणीचे साम्राज्य ; प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचोरा प्रतिनिधी । शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अद्यापही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, हगणदारीमुक्तीचा बोजवारा झाला आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी कचऱ्‍याचे ढीग पहायला मिळत आहे. “स्वच्छ शहर सुंदर शहर” ही संकल्पना जाहिरातीपुरतीच सिमीत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. “स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९” कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. पाचोरा शहराची भौगोलिक स्थिती पाहता साधारण ४ कि. मी. च्या परिसरात पालिकेचे क्षेत्र आहे. पाचोरा नगरपरिषदेत १३ प्रभाग असून २६ नगरसेवक आहेत. नवीन वस्ती, कॉलनी भाग झपाट्याने वाढत आहे. पालिकेतर्फे शहर स्वच्छतेचा ठेका दिला आहे. शहरात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. मात्र आहे त्या गटारी तुडुंब भरल्या असून ठिकठिकाणी कचऱ्यायाचे ढीग, प्लॅस्टिक, सांडपाण्याचे डबके, कोंबड्या, बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे, छाटलेले पंख, गटारीतील काढलेली घाण भर रस्त्यावर जागोजागी पडलेली आहे. 

मात्र नगरपालिका आरोग्य विभाग सुस्त असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास पालिका प्रशासन, सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसून येत नाही. पाचोरा शहरात स्वच्छ केवळ नावालाच ‘सर्व्हेक्षण’ राबविले, लाखो रुपये जाहिराती व स्वच्छतेसाठी खर्ची घातले असतांनाही शहरात घाणीचे साम्राज्यच पाहायला मिळत आहे. प्लॅस्टीक कॅरीबॅगचा सर्रास वापर होतोय. पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असतांना नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून त्या आदेशाची पायमल्लीच होत असून एक – दोन थातुरमातुर कारवाया केल्या आहेत. तरी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने त्वरित पाचोरा शहरातील विविध भागातील स्वच्छता मोहीम सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

Protected Content