आपल्या खुशखुशीत शैलीतील लिखाणासाठी सोशल मीडियात अलोट लोकप्रियता लाभलेले अष्टपैलू व्यक्तीमत्व प्रशांत कुळकर्णी आता लाईव्ह ट्रेंडस न्यूज साठी लिखाण करणार आहेत. आज त्यांचा हा पहिला लेख.
ऑस्ट्रियातील इन्सबर्ग या एका नितांत सुंदर अशा शहरातील संध्याकाळची प्रसन्न वेळ होती…इंन्सबर्गचे सौंदर्य वर्णन करायला खरंतर शब्द नाहीत….मनमोहक , विहंगम अशा निसर्गाची येथे अक्षरशः उधळण झालेली दिसते….निसर्गाचा स्वर्गीय आविष्कार म्हणजे तो हाच की काय इतकं या शहराचे सौंदर्य मनाला भुरळ घालते….या शहराच्या कोपर्याकोपर्यावर, कुठल्याही वळणावर एक असा नितांतसुंदर नजरा बघायला मिळतो…
आम्ही गेलो तेव्हा जून महिन्यामधलं आल्हाददायक वातावरण होतं….
नदीकाठावरील एका छोट्याशा आपल्याकडे असतो तशा ढाब्यासारखे आटोपशीर, नीटनेटके, टुमदार रेस्टॉरंटमध्ये आम्ही बसलो होतो…..संध्याकाळचं उत्साहवर्धक वातावरण होतं…….मंद मंद मनाला मदहोश करणारी हवा वहात होती….आजूबाजूच्या बाकावर कोणीच नव्हतं….फक्त आम्हीच…युरोपात नेहमी अनुभवायला मिळते ती निरव शांतता मनाला प्रसन्न करतं होती….त्या रेस्टॉरंटच्या अगदी बाजूला लगतचं खळाळून वाहणारी नदी त्या निरव प्रसन्न शांततेत जणू संगीत भरत होती…..मस्त गरमागरम इटालियन पिझ्झा आणि पास्ता समोर आला होता…म्हाळसाबाई आणि अर्ध तिकीट दणादण ते हाणतं होत्या…मी एकटाच बोरं होतं बसलो होतो….गेल्या आठ दिवसांपासून तेच पिझ्झा, पास्ता, बर्गर आदी बघून-खावून मला वीट आला होता.
मी एकटाच काहीही न खाता बसलेला पाहून तिथेच समोर बसलेल्या डॅनियल काकांना माझी दया आली….ते म्हणाले आमच्या जॅकला पाठवून देतो तू जरा त्याच्याशी दोन तीन राऊंड मध्ये गप्पा मार तेवढाच तुझा विरंगुळा होईल…वाह वाह मला कोण आनंद झाला….मी म्हटल पाठवा बिनधास्त ! डॅनियल काकाचा जॅक लगेच धावतपळत आला आणि आमच्या मस्त भन्नाट गप्पा सुरु झाल्या. तुम्हाला सांगतो असे दोन मित्र गप्पा मारत बसले की बायको नावाच्या मंगळसूत्राला जाम राग येतो…उगाचंच आपली चिडचिड सुरू करतात… आता गरीब बिचारे दोन मित्र गप्पा मारतायतं म्हटल्यावर बसू द्यावे की निवांत पण नाही ? असो …आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या… पिझ्झा आणि पास्ता सपाट होतं पसाट झाला होता….बाहेर खळाळून वाहणारी नदी बहुदा म्हाळसाच्या बाजूने झाली होती, ती म्हाळसाच्या रागासारखी अधिकचं खळखळून वाहत होती…मी आपलं जॅकला म्हंटल बाबा रे आजच्या दिवसापुरत्या एवढया गप्पा बास झाल्या, आता तू ये….असं म्हणून त्याच्याशी शेवटचं एक हस्तांदोलन केलं आणि उठलो.
आमचं राहण्याचं हॉटेल या रेस्टॉरंटपासून जवळच होतं म्हणजे साधारण एक किमी…चालतं मोजून पंधरा मिनिटं….युरोपात चालणे हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे…येथे छोट्या अंतरासाठी रिक्षा किंवा तत्सम असं काही नाही नसतंच…..एक तर बस किंवा सरळ टॅक्सी….एवढ्या छोट्या अंतराला दोघेही परवडतं नाही म्हणून आपलं पायाची अकरा नंबर बस पकडतं तंगडतोड करतं हॉटेलकडे निघालो.
म्हाळसाबाई रस्त्याला लागल्या तसं मी त्यांच्या मागे निघालो. तेवढ्यात मला जॅकशी गप्पा मारत असतानाचे त्याचे शब्द आठवले….तो म्हणत होता ममी बायकोच्या खूप ताब्यात आहे, मी म्हणे बायकोचं लै ऐकतो…एवढं बायकोचं ऐकायचं नसतं…ते आठवलं आणि डोक्यातील ट्यूब पेटली….
जागेवरून शक्य होईल तसं सरळ उभा रहातं जाड जिभेने सॉरी सॉरी जड आवाजात म्हाळसाला हाक मारली….
ये बायको….बायको पलट…पलट…अरे मी म्हणतो ना पलट …
मी असं म्हंटल अन च्यामारी बायको खरंच पलटली ना रावं…..बायकोने माझं ऐकलं हे बघून मला कोण आनंद झाला….आयला एवढा मानसन्मान माझ्या शब्दाला आयुष्यात कधी मिळाला नव्हता…डॅनियल काकांच्या जॅकचे मी मनोमन आभार मानले….बायको कधी नव्हे ते इतकं प्रेमानं माझ्याकडे पाहत होती….. शेवटचं इतकं प्रेमाने तिनं माझ्याकडे कधी पाहिलं हे मी आठवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला…..आयला म्हंटल हे भारी राव….जॅकने करामतच केली होती…
मी म्हंटल मबायको आपण मेन रस्त्याने नाही जाने का…ह्ये आस नदीच्या किनारे किनारे पायवाटेने चालतं चालतं जायेंगे. माझ्यातला अशोक सराफ आणि शाहरुख खान मिक्स तिला समजला असावा….
कुठलाही विरोध न करता म्हाळसाबाई नदीच्या कडेकडेने यायला तयार झाल्या…पुन्हा एकदा मी जॅकचे आभार मानले. आम्ही निघालो.
युरोपातील लोकांची सौंदर्यदृष्टी आणि कल्पनावृत्ती खरंच अफाट आहे….तिथल्या कुठल्याही साध्यातल्या साध्या गोष्टी ते आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या जागेचे सौंदर्य खुलवून टाकतात….इथला त्या नदीच्या बाजूचा रस्ताही इतका भन्नाट असतो की विचारू नका. बाजूला खोल वाहणारी नदी आणि त्याला अगदी लागूनच पण तरीही अगदी सुरक्षित असे दोन दोन वेगवेगळे समांतर ट्रॅक…एक पायी चालायला, एक सायकल साठी.ते ही एवढे मोठे की एखादं सोळा चाकी वाहन त्यावरून सहज जाऊ शकेल. आणि या दोन ट्रॅकची विभागणी करणारी अफलातून अशी तयार केलेली झाडांची एक कलात्मक रचना…..दोन्ही बाजूला प्रत्येक काही मीटर अंतरावर ठिकठिकाणी बसायला प्रशस्त असे बाकडे…..ते साधे बाकडेही एवढे आरामदायी, आकर्षक बनवलेले असतात आणि त्यांचे रंगही इतके मनमोहक असतात की चालणार्याला क्षणभर का होईना बसायचा मोह व्हावा. म्हणजे त्या नुसत्या बाकड्यावर निवांत बसून समोर वाहत असणारी नदी जरी पाहत बसलं तरी मनाला हलकेपणा यावा….या केवळ एक किमी अंतरावर पन्नास बाकडे आणि दोन स्वतंत्र बागा बघितल्या. या बागाही अगदी कलात्मकरीत्या झाडांनी पानाफुलांनी सजवलेल्या होत्या. या दोन्ही ट्रॅकवर कुठल्याही प्रकारच्या वाहनांना बंदी त्यामुळे लहान मुलं, मोठी माणसं अगदी बिनधास्त सायकलिंगचा आनंद लुटुत होती, काही लहान मुले स्केटिंग करतं होती. कोणी एक पायाने ढकलत चालवायची तीन चाकी सायकल पळवतं होतं. हे सर्व करताना कोणी उगाचंच खेळत होते तर कोणी ते चालवताना त्यातून काही कल्पकतेने नजाकती,काही कसरती करतं होते…जो तो आपल्या आपल्या नादात मस्त होता.
नदीच्या एका ठिकाणी खाली उतरायला एक पायवाट होती….ती उतरून खाली गेलं की नदीच्या अगदी काठावर जराशी सपाट जागा होती….तिथे काही तरुण तरुणी अगदी १८-२० वयोगटातील असतील…असे मस्त घोळका करून बसले होते…कोणी तिथल्या दगडावर, तर कोणी बाजूच्या झाडाच्या बुंध्यावर तर कोणी नदीच्या कडेला पाय सोडून बसलेले तर कोणी त्या सपाट जागेवर काहीतरी अंथरून बसलेले….त्यांच्या हातात काहीना काही वाद्य होते. कोणाकडे गिटार तर कोणाकडे छोटा पियाना तर कोणाकडे माऊथ ऑर्गन ! गप्पा चेष्टा मस्करी करतं त्यांचा ते गायन वादन सुरू होतं….आजूबाजूच्या जगाशी काहीही देणंघेणं न ठेवता आपल्याच विश्वात ही तरुण मुलं व्यस्त होती…त्यात कुठेही थिल्लरपणा किंवा बीभत्सपणा नव्हता…त्यांच्याबरोबर त्यांनी काही खायला प्यायलाही आणलं होते. काही क्षण तिथेच एका बाकड्यावर बसून मी त्याच्यातला काही उत्साह चोरून घेतला आणि पुढे निघालो.
एका छोट्याशा बागेत काही लहान मुले खेळताना दिसली….त्यांच्या पासून काही अंतरावर दोन-तीन बायका बहुदा त्यांच्या आया गप्पा मारत उभ्या होत्या….नक्कीच आपापल्या नवर्याच्या नावाने शंख टाळ कुटत असणार…असो. त्या नदीच्या किनार्यावरुन चालताना अतिशय प्रसन्न वाटतं होतं.
आमचं हॉटेल जवळ येऊ लागलं….आता आम्ही डावीकडे वळून मुख्य रस्ता ओलांडून पलीकडे गेलो की हॉटेल मध्ये पोहोचणार होतो की त्या वळणावर एक अजून गमतीदार गोष्ट दिसली…तिथे त्या वळणावर एका ठिकाणी एक छोटीशी शेड केलेली होती. त्या शेडच्या आत मध्ये सायकल धुवायची सार्वजनिक व्यवस्था केलेली होती. अर्थातचं विनामूल्य… आपण आपली सायकल घेऊन जायचं…सायकलचं हँडल जरा उंच करून टांगायला व्यवस्थित अशी योजना केलेली…आपण आपली सायकल तिथे अडकवायची. बाजूलाच हायप्रेशर पाण्याचा पाईप आणि त्याला शॉवर कॅप लावलेली. नळ चालू केला की जोरदार प्रेशर ने पाणी यायचं….आपण आपली सायकल यथेच्छ धुवायची… अशा एकाच वेळी पाच सहा सायकल धुता येतील अशी व्यवस्था. बरं एवढं जोरदार पाण्याचा फवारा उडतं असूनही एक थेंब पाणी रस्त्यावर आलेले नव्हतं….सायकल धुवून झाली की सायकल वाळवण्यासाठी तिथेच असाच हाय प्रेशरचा हवेचा फवारा होता….आणि हे सर्व आपलं आपण करायचं…कुठला चार्ज नाही की तिकीट नाही…कसलं भन्नाट ना…मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटलं…असो
डावीकडे वळून घेऊन रस्ता ओलांडून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो…
ऑस्ट्रिया या देशातील एका इन्सबर्ग नावाच्या शहरातील एक संध्याकाळ एक अभूतपूर्व आठवण आमच्या मनात कोरली गेली होती…आयुष्यात कधी ऑस्ट्रियात गेलात तर इन्सबर्ग चुकूनही चुकवू नका.
:- प्रशांत कुळकर्णी
(प्रस्तुत लेखक हे सोशल मीडियात अतिशय दर्जेदार लिखाण करण्यासाठी ख्यात आहेत.)