जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या कारभारात मोठी आर्थिक अनियमितता समोर आली असून, पतसंस्थेने ८४० सभासद कामगारांचे पगारातून परस्पर लाखो रुपये कपात केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला. संतप्त वायरमन आणि तांत्रिक कामगारांनी पतसंस्थेत ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्यामुळे व्यवस्थापनाला नमते घेऊन पैसे परत करण्याची भूमिका घ्यावी लागली.
पतसंस्थेच्या सभासद असलेल्या वायरमनसह तांत्रिक कामगार अशा एकूण ८४० कर्मचाऱ्यांचे हे पैसे कपात करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एका कामगार सभासदाच्या पगारातून तब्बल तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा स्पष्टीकरण न देता परस्पर कपात करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी पतसंस्थेच्या कार्यालयात जमून व्यवस्थापनाला घेराव घातला.

पतसंस्थेचा खुलासा:
ठिय्या आंदोलनानंतर पतसंस्थेच्या व्यवहारावर खुलासा करताना मुख्य लिपिक अशोक धांडे यांनी सांगितले की, शिर्डी येथे पतसंस्थेचे मोठे भवन उभारण्यात येत आहे आणि त्यासाठीच ही रक्कम कापण्यात आली होती. त्यांनी असाही दावा केला की, विनापरवानगी कुठल्याही सभासदाचे पैसे कापलेले नाहीत आणि याबाबत सभासदांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे.
कामगारांचा आक्रमक पवित्रा:
मात्र, कामगारांनी पतसंस्थेचा हा दावा फेटाळून लावत, “जोपर्यंत कपात केलेले पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत पतसंस्थेतून उठणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गोंधळ वाढल्यानंतर अखेर पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. मुख्य लिपिक अशोक धांडे यांनी पुढे माहिती दिली की, संचालक मंडळ आणि अध्यक्षांच्या आदेशानुसार आता सभासदांचे लिखित अर्ज घेऊन त्यांचे कापलेले पैसे त्यांना परत दिले जातील. कामगारांच्या ठिय्या आंदोलनानंतर पतसंस्थेने पैसे परत करण्याची भूमिका घेतल्यामुळे कामगारांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असले तरी, एकाच वेळी ८४० कामगारांचे लाखो रुपये कपात करण्याचा पतसंस्थेचा हा निर्णय आणि त्यामागील प्रक्रिया यावर कामगार संघटनांनी गंभीर आक्षेप घेतला आहे.



