ब्रेकींग : तात्काळ होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने आज कमी पाऊस पडणार्‍या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ तर मुंबई व कोकणात दुसर्‍या टप्प्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्काळ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागली होती.. निवडणूक आयोगाने १३ तारखेला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज दुपारी सुनावणी झाली.

निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपंचायत निवडणूक सप्टेंबरमध्ये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. त्यामुळे यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याच्या उत्सुकतेचे निराकरण आज दुपारच्या सुनावणीत झाले. यावेळी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाल महत्त्वाचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने जिल्हानिहाय त्याचा आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगावर हा निर्णय सोपवत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देतांना जिथे पाऊस कमी होतो तेथे तात्काळ निवडणुका घेण्याचा निर्णय दिला. यात मराठवाडा, विदर्भ, खान्देश आदी भागांमध्ये तात्काळ निवडणुका होऊ शकतात. तर मुंबई आणि कोकणात मात्र दुसर्‍या टप्प्यात अर्थात पावसाळ्यानंतर निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा हा निकाल अतिशय महत्वाचा असून ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून-जुलै महिन्यात होऊ शकतात.

Protected Content