मुंबई प्रतिनिधी । राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन जारी होण्याचे संकेत मिळाले असून याच्या अंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश असतील अशी माहिती समोर आली आहे.
नव्या विद्यापीठ कायद्यानुसार दरवर्षी विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये निवडणुका होणार आहेत. यात थेट मतपेटीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. हे प्रतिनिधी प्रत्येक महाविद्यालयातून एकूण पाच जागा निवडणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या निवडणुका वेळेत होतील की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. तथापि, ताज्या वृत्तानुसार आता याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच निघणार आहे. यात ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयास निवडणूक घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या संदर्भात १७ जुलै रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्र कुलगुरू आणि रजिस्ट्रारची बैठक मुंबईत होणार असून यानंतर हे नोटिफिकेशन निघू शकते.