निवडणुका दिवाळी नंतरच होणार : आयोगाने दूर केला संभ्रम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबाबत मोठ्या संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. राज्यातील २२ महापालिकांसह जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आदींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या आहेत. यात मध्यंतरी राज्य निवडणूक आयोग निवडणुकांसाठी घाई करत असल्याची माहिती समोर आली होती. तथापि,  राज्यातील मुदत संपलेल्या २२ महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांसह पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी येत असल्याने दिवाळीनंतरच्या काळात निवडणुकांचा विचार करता येईल, असं प्रतिज्ञापत्र आयोगानं   न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे.

राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत निवडणुका घेण्यासाठी येणार्‍या अडचणी मांडल्या. तसेच मुंबईसह नागपूर, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका असल्यामुळे त्या एकाच टप्प्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे दोन-तीन टप्प्यात या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. यामुळे येत्या ४ जूनला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तरी तात्काळ म्हणजे जून-जुलैमध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या नंतरच या निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जून-जुलैमध्ये निवडणुका झाल्या नाहीतर या निवडणुका थेट दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. जवळपास ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.

Protected Content