निवडणुका पुढे ढकला : बावनकुळे निवडणूक आयुक्तांना भेटणार

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिकांच्या जाहीर केलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी आपण निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कालच राज्यातील ९२ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून १८ ऑगस्टला मतदान तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे सांगण्यात आले असून आरक्षणीही यानुसारच काढण्यात आलेले आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच प्रभाग, गट आणि गण रद्द करून जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती. आता निवडणूक आयोगाने नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बावनकुळे यांनी याला विरोध केला आहे. या संदर्भात आपण सोमवारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या सोबत निवडणूक आयुक्तांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. हंगाम संपल्यानंतर तसेच ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

Protected Content