मुंबई वृत्तसंस्था । आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. येत्या ५ ऑक्टोंबर रोजी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे देखील यावेळी ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले. बरेच दिवस मी बोललो नव्हतो. आता सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या जनतेपुढे सर्वकाही सांगेन, असे राज म्हणाले.
ईव्हीएम विरोधाची भूमिका मी घेतली होती. निवडणूक लढवावी की नाही या विचारात मी होतो. मात्र ईव्हीएमच्या विरोधाबाबत मी अनेक नेत्यांना भेटलो. सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. पण कालांतराने कुणीही ठोसपणे पुढे आले नाही. मी अनेकांशी या विषयावर बोललो, त्यानंतर आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा? असा विचार केला. पक्षात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. भाजपकडून कुठली ना कुठली चूक होईलच आणि त्यात आपल्याला यश मिळू शकते. माझा आतला आवाज सांगतोय, या वेळेला यश मिळेल. मनसे फक्त निवडणूक लढणार नाही, तर जिंकणार, असेही राज म्हणाले. दरम्यान, माझ्यासह पवार कटुंबीयांमगे ईडीची चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये, हा उद्देश आहेत असे देखील यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
शिवसेनेला खिंडार
नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी सोमवारी राज यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला.