…तर सहा दिवसांनी लागेल लोकसभेचा निकाल !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । इव्हीएमशी जोडलेल्या व्हीव्हीपॅट स्लीपांची मोजणी केल्यास निकाल तब्बल सहा दिवस उशीरांनी लागू शकतो असा दावा करत निवडणूक आयोगाने याला नकार दिला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, देशातील २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत एका मतदारसंघातील किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप जुळवून पाहण्याची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचार करण्यास सांगितले होते. मात्र निवडणूक आयोगाने यात अडचण असल्याचे सांगितले आहे. जर प्रत्येक संसदीय किंवा विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप्स जुळवल्या तर यामुळे मतमोजणीला उशीर होऊ शकतो. यामुळे सुमारे ६ दिवस जास्त लागू शकतात. अशावेळी लोकसभा निवडणूक निकालाची घोषणा २३ ऐवजी ६ दिवस उशिराने होणार असल्याचे प्रतिपादन निवडणूक आयोगाने केले आहे. व्हीव्हीपॅटमधून निघणार्‍या स्लीपवर कोणताच बारकोड नाही. त्यामुळे निवडणुकीचे निकाल ३० किंवा ३१ मे आधी येऊ शकणार नाही. त्याचबरोबर या स्लीप मोजण्यासाठी मोठ्याप्रमाणावर कर्मचार्‍यांची गरज भासेल. इतकेच नव्हे तर मतमोजणी करण्यासाठी मोठ्या जागेची गरज भासणार असल्याने निवडणूक आयोगाने याला नकार दिला आहे

विरोधी पक्षांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल केली होती. व्हीव्हीपॅट स्लीप पडताळून पाहिल्यास निकालाला केवळ तीन ते चार तास उशीर होईल. पण निवडणूक आयोगावरील विश्‍वास वाढेल, असे त्यांचे म्हणणे होते.

Add Comment

Protected Content