जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घराला अज्ञात इसमाने आग लावून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीबाई तुकाराम गायकवाड (वय ७०, रा. नांद्रा ता. जामनेर) या आपल्या घरी वास्तव्यास असताना, १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात आरोपीने जाणीवपूर्वक लक्ष्मीबाई यांच्या घरासमोर असलेल्या लोखंडी जाळीला लावलेल्या हिरव्या नेटला आणि घराच्या बाहेरील इलेक्ट्रिक वायरिंगला आग लावली. मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने ही आग लावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मध्यरात्री अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे भौतिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर लक्ष्मीबाई गायकवाड यांनी पहूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




