मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सोमवारी २४ मार्च दुपारी एका वृद्ध महिलेची पिशवी कापून अज्ञात चोरट्यांनी ८५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाबाई प्रभाकर काळे (वय ६२, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) या वृद्ध महिला सोमवारी दुपारी एक वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतील ८५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेली. घटनेचा उलगडा झाल्यानंतर वृद्ध महिलेने बँकेसह परिसरात शोध घेतला, मात्र कुठलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीला सुरूवात केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे करत आहेत.
या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात खळबळ उडाली आहे. बँकेत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.