जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोडवरील स्वप्निल अपार्टमेंट येथे उधारीच्या पैशांवरून लहान भावाकडून मोठ्या भावाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून लोखंडी पाईप डोक्यात टाकून दुखापत केल्याची घटना सोमवारी २० मे रोजी रात्री ११.३० वाजता घडली याप्रकरणी मंगळवारी २१ मे रोजी पहाटे ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, गुणवंत विजय सपकाळे वय २९ रा. आसोदा रोड, गणेश पार्क, जळगाव हा तरूण वास्तव्याला आहे. गुणवंतने त्याचा लहान भाऊ सागर विजय सपकाळे याला उसनवारीने पैसे दिले होते. त्यामुळे गुणवंत सपकाळे याने सोमवारी २० मे रोजी रात्री ११.३० वाजता लहान भाऊ सागर याला उधारीचे पैसे मागितले. या रागातून लहान भाऊ सागर सपकाळे याने मोठा भाऊ गुणवंत याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी मंगळवारी २१ मे रोजी पहाटे ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर विजय सपकाळे वय २७ रा. तळेले कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.