मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे मुंबईहून जिल्ह्यात परतले असून ते आपल्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत उद्या पत्ते खोलण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे रात्री उशीरा मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. वैद्यकीय उपचाराससह भाजपच्या कार्यकारिणी बैठकीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. खडसे यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या या दौर्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. तथापि, या दोन्ही नेत्यांनी भेट होणार नसल्याचे स्पष्ट करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, एकनाथराव खडसे हे काल दुपारी मुंबईहून निघाले. ते चाळीसगावमार्गे जिल्ह्यात आले. चाळीसगाव येथे त्यांनी आपल्या कट्टर समर्थकांची भेट घेतली. यात भाजपचे माजी आमदार साहेबराव घोडे, कैलास सूर्यवंशी आदींसह अन्य प्रमुख पदाधिकार्यांशी त्यांनी सल्ला मसलत केली. आज रविवारी नाथाभाऊ हे पुन्हा एकदा आपल्या प्रमुख समर्थकांची भेट घेणार असल्याचे समजते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी जामनेर दौर्यावर येत आहेत. ते जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याआधी अर्थात १२ रोजीच नाथाभाऊ हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यांनी अनेकदा भाजपचा त्याग करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी सोमवारचा मुहूर्त टळणार नसल्याचे त्यांचे समर्थक ठासून सांगत आहेत.