मुक्ताईनगर प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आज जिल्ह्यात परतले असून जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील जमीन प्रकरणाबाबत ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती आणि जावयांची चौकशी सुरू केली आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी हे अटकेत असून नाथाभाऊंची चौकशी झाली आहे. तर मंदाताई खडसे यांनी चौकशीसाठी वेळ मागून घेतला आहे. दरम्यान, मध्यंतरी एकनाथराव खडसे हे वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी देखील केली होती.
परवाच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने खडसे कुटुंबाच्या मालकीची सुमारे ५ कोटी ७३ लाख रूपये मूल्य असणारी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. या संदर्भात उद्या जळगावातील अजिंठा विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाथाभाऊ जळगावात दाखल झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बँक निवडणुकीबाबत आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.