मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याच्या नियोजनासाठी येथे बैठक घेण्यात आली.
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच्या अंतर्गत १ सप्टेंबरला मुक्ताईनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यासाठी जल्हा बँकेच्या अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी व जळगाव येथील मुक्ती फाउंडेशनकडन १ सप्टेंबरला ज्ञानदीप मंगल कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. शिबिरात हृदयरोग तपासणी, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, नाक कान व घसा, हाडांचे विकार तपासणी, नेत्र तपासणी, महिला व बालरोग व इतर तपासण्या मोफत करण्यात येतील. यासोबत बिनाटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व दंत व्यंग उपचार शिबिर देखील घेण्यात येणार आहे.
याशिवाय, अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव आणि मुक्ताई सांस्कृतिक कला मंचतर्फे १ सप्टेंबरला कोथळी येथील जुने मुक्ताबाई मंदिर परिसरात भजन संध्या आयोजित करण्यात आलेली आहे. तर संवेदना फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ७ सप्टेंबरला मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाची राजकीय वाटचाल : काल, आज आणि उद्या या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे.