जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा येथील सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.
कुर्हा-काकोडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात खडसे म्हणाले होते की, हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे.तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला असं एकनाथराव खडसे म्हणाले होते.
खडसे यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले होते. यावरून ब्राह्मण समाजातून प्रतिक्रिया उमटली होती. यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा देखील दवे यांनी दिला होता.
या पार्श्वभूमिवर, आज एका ट्विटच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी माफी मागितली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020