मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला असून यामुळे आता नवीन मुख्यमंत्री कोण बनणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात तीन दिवसांपूव झालेल्या मतमोजणीत महायुतीने मोठी मुसंडी मारत दणदणीत बहुमत संपादन केले. यानंतर सत्ता स्थापनेसाठी बैठकांचे सत्र सुरू असतांनाच आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी महायुतीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. 2022 साली जून महिन्यात शिवसेनेत फुट पाडत एकनाथ शिंदे हे वेगळे झाले. भाजपच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केले. यानंतर एक वर्षानंतर अजित पवार यांचा गट देखील सत्तेत सहभागी झाला. यानंतर राज्यात पहिल्यांदाच एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अशी राजकीय स्थिती बनली. आता महायुतीला पुन्हा बहुमत मिळाले आहे. यात सत्तास्थापनेसाठी जोरदार खलबते सुरू असतांनाच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर पर्यंत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता नवीन मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री नेमके कोण असणार ? याची सर्वांना उत्सुकता लागली असून याकडेच लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील यावर भाजप नेतृत्वाने शिक्कामोर्तबत केला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.