मोठी बातमी : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर शिंदे गटाची पुन्हा एकदा सरशी झाली आहे. विधीमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचे पत्र जारी केले आहे. हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे राज्यात सत्ता स्थापन झाली असतांना शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात कायदेशीर पेच देखील सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांचा पाठिंबा आहे, तर ठाकरे गटाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. यातच दोन्ही बाजूंनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा ठोकला आहे. शिंदे यांचे बंड समोर आल्यानंतर शिवसेनेतर्फे अजय चौधरी यांना गटनेते करण्यात आले होते. तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचा दावा बंडखोर गटातर्फे करण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमिवर, विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे. हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. यातून ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या गटाने काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेला पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी नोटीस जारी केली, तर कायद्यानुसार आदित्य ठाकरेंसह उर्वरित १५ आमदार निलंबित होऊ शकतात. या अनुषंगाने आता शिंदे गट पुढे काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

यासोबत विधीमंडळ सचिवालयाने भारत गोगावले हेच शिवसेनेचे प्रतोद असतील असा निर्णय देखील दिला आहे. यामुळे सुनील प्रभू हे प्रतोद नसतील हे देखील सिध्द झाले आहे. आज शिंदे सरकारवर विश्‍वासदर्शक ठराव संमत केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमिवर विधीमंडळ सचिवालयाच्या या दोन निर्णयांमुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे यांना मात्र जोरदार धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content