मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ तसेच आपल्या सहकारी आमदारांसह अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
साम टिव्ही या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्यासाठी अयोध्येची वारी करण्याची योजना आखली आहे. पुढील आठवड्यात शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यानंतर हा दौरा होऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. अलीकडच्या काळात आदित्य ठाकरे यांनी आपल्या सहकार्यांसह केलेला अयोध्या दौरा गाजला होता. याला व्यापक प्रसिध्दी मिळाली होती. यानंतर आता शिंदे यांचा दौरा गाजणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठीच आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो असल्याचे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी वारंवार सांगत आहेत. यामुळे आपली हिंदुत्ववादी भूमिका ही स्पष्टपणे अधोरेखीत करण्यासाठी अयोध्या दौरा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अनुकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.