बिग ब्रेकींग : शौचालय घोटाळ्यात लेखाधिकार्‍यांसह चौघांना अटक

रावेर-शालीक महाजन | येथील पंचायत समितीत झालेल्या सुमारे दीड कोटी रूपयांच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळ्यात रात्री उशीरा लेखाधिकार्‍यांसह चौघांना अटक करण्यात आली असून अजून देखील काही जण रडारवर आहेत. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून अनेक वेळा अनुदान लाटून घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

शौचालय योजनेत भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी रावेर पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारीसह चार जणांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर अपहार झाला होता.या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते दोघे अद्याप पसार असतांना रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा टेक्निकल,तांत्रिक,व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु होता.अखेर या भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलेले आरोपींच्या अटकसत्रला सुरुवात झाली आहे.

या प्रकरणी काल रात्री उशिरा पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा पाडळा बु) आणि बाबुराव संपत पाटील (रा विवरे बु) यांना अटक केली आहे. याच प्रकरणात एक पेक्षा अनेक वेळा अनुदान लाटलेले तब्बल १२६ जण पोलिसांच्या रडारवर असुन अनुदान वर्ग करण्यात निष्काळजीपणा करणार्‍या पंचायत समितीच्या काही अधिकार्‍यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. पत्रकार कृष्णा पाटील यांच्यामुळे या शौचालय योजनेच्या भ्रष्ट्राचार प्रकरणाचा भांडाफोड झाला होता.रात्री केलेली कारवाई पोलिस निरिक्षक कैलास नागरे,सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल वंजारी,विकारुद्दीन शेख,अमोल जाधव,सुकेश तडवी,सचिन घुगे,सुरेश मेढे,समाधान ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून यात अनुदान लाटून अपहाराला हातभार लावणार्‍यांवर देखील कारवाईची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. तर याच प्रकारातील सूत्रधार असलेल्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

Protected Content