मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे सत्तारूढ झाले असले तरी ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी नवीन सरकारवर टीका केली.
माजी मुख्मंत्री उध्दव ठााकरे यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आजवर गेल्या अडीच वर्षात मी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत होतो. आता प्रत्यक्ष साधणार आहे. कालच आपण नवीन सरकारचे स्वागत केले असून त्यांनी चांगले काम करावे ही अपेक्षा आहे. नवीन सरकारबध्दल ते म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे असे ठरले होते. असे झाले असते तर आता जे झाले ते सहजपणे झाले असते. मग त्या वेळेला नकार देऊन भाजपने आता सत्तांतर का केले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप सोबत जाणार्यांनी स्वत:ला हा प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. कारण शिवसेनेला बाजूला ठेवून कुणी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनू शकत नाही. आरे कार शेडबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाने आपल्याला दु:ख झाले असल्याचे ते म्हणाले. आपण पर्यावरणाच्या सोबतच आहोत, तसेच आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका असे त्यांनी नमूद केले.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, चारही स्तंभांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असून लोकशाहीचे धिंडवडे थांबविण्याची गरज आहे. अमित शहा यांनी मातोश्रीवर जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नसल्याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला. आपण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर राज्यातून जी प्रतिक्रिया उमटली ते भारावणारे होते. आपले अश्रू हीच माझी ताकद असून ती लढण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे ज्या प्रकारे मुख्यमंत्री बनले हा प्रयत्न जनतेला आवडणार की नाही हे जनता ठरविणार असल्याचे देखील ते म्हणाले.