देवेंद्र फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । काल अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.

काल राज्यात राजकीय वर्तुळाला हादरा देणार्‍या अनेक घटना घडल्या. एक तर फडणवीस यांनी स्वत: घोषणा करून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. याप्रसंगी आपण सरकार बाहेर राहू असेही त्यांनी सांगितले. तर काही वेळातच त्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. तर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या संदर्भातील ट्विट केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. मात्र त्यांची देहबोली ही अस्वस्थतेची दिसून येत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. आज सकाळपासून देवेंद्र फडणवीस हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्ष कार्यालयात आयोजीत सरकार बदलल्याच्या प्रित्यर्थ आयोजीत आनंदोत्सवात ते सहभागी झाले नाहीत. तसेच त्यांच्या समर्थकांनीही याकडे पाठ फिरविली.

यामुळे फडणवीस आणि त्यांचे समर्थक हे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. यातच मुंबईत फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शाह यांचा फोटोदेखील गायब असल्याने ही चर्चा नव्याने सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत आनंदोत्सवात सुधीर मुनगंटीवार हे सहभागी झाले. पक्षातर्फे यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे आज सकाळपासून बैठकांमध्ये व्यस्त असून सत्तेच्या वाटाघाटी अद्यापही सुरू असल्याने ते आनंदोत्सवात सहभागी झाले नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

Protected Content