मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी वार्तालाप केला असला तरी माघार घेण्यास साफ नकार दिल्याने शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी शमणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत त्यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी देखील वार्तालाप केल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात टीव्ही ९ मराठी या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून उध्दव ठाकरे यांच्याशी बोलतांना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारला. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्ती केली आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण अद्याप कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही. कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. तरीही माझ्यावर कारवाई का झाली? असे अनेक सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याची माहिती समजत आहे.