मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे हे उद्या अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. यात ते नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना काल रात्री सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी खुद्द खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदा खडसे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.
या अनुषंगाने आज सायंकाळी एकनाथराव खडसे यांना उद्या अर्थात दिनांक ८ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबतचे समन्स त्यांना जारी करण्यात आले आहे. ते ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत ते भोसरी जमीन प्रकरणाशी संबंधीत माहिती देऊ शकतात. यासोबत ते काही गौप्यस्फोट देखील करण्याची शक्यता असल्याने या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. @EknathGKhadse हे उद्या, दि. ८ जुलै २०२१ रोजी स. १० वा. पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
स्थळ- नवीन राष्ट्रवादी भवन,जे.एन.हेरेडिया मार्ग बॅलार्ड इस्टेट, मुंबई
सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती!
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021