मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यातून त्यांचे पावणेतीन वर्षांनी राजकीय पुनर्वसन झाले आहे.
एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात जून २०१६ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांना २०१९ मध्ये उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती. तर त्यांच्या जागी तिकिट मिळालेल्या त्यांच्या कन्येचा पराभव झाला होता. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ते खर्या अर्थाने राजकीय विजनवासात होते. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी त्यांचे नामांकन करण्यात आले असले तरी राज्यपालांनी ही यादीच प्रलंबीत ठेवली.
यानंतर जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळाली. आणि ते यात सहजपणे निवडून आले. त्यांच्या निकालानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी होऊन सत्तांतर झाले. यानंतर आज त्यांनी राजभवनात विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. आज एकूण १० नवनिर्वाचीत सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी आज विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडल. भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी या सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी एकनाथराव खडसे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या माध्यमातून पावणेतीन वर्षांनी विधीमंडळात त्यांची पुन्हा एंट्री होणार आहे.