जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेने मुक्ताई शुगर अँड अलाईड या खासगी कारखान्याला गैरप्रकारे कर्ज दिले असून यात मोठा आर्थिक घोळ झालेला आहे. कर्जाचा विचार केला असता आपण नेहमी अदानींबद्दल ऐकत असतो…मात्र एकनाथ खडसे हे जिल्ह्याचे अदानी असल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला. त्यांनी खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक गैर व्यवहाराचे गंभीर आरोप यावेळी केले आहेत.
आ. पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत खडसे यांची कन्या चेअरमन आहे, त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या कारखान्याला त्यांनी एकापाठोपाठ एक कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे, मुक्ताई साखर कारखान्याला एकूण सव्वाशे कोटींचे कर्ज देताना सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
हा कारखाना थकबाकीदार होता, त्याचा लिलाव करण्यात आला होता. मग त्याची पत एवढे मोठे कर्ज द्यावे, एवढी मोठी कधी झाली. कर्ज देताना कोणती हमी घेण्यात आली. या कारखान्याने ५५ कोटींचे गेल्या वर्षीचे कर्ज फेडल्याचे मला बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तेव्हा या कारखान्याला नेमके उत्पन्न किती झाले. असा माझा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांचा खुलासा गरजेचा आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती डबघाईची असताना एका खाजगी कारखान्याला एवढे कर्ज का देण्यात आले ? याबद्दल मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे सगळे प्रकरण टाकणार असून न्याय मागणार आहे, असेही आ. पाटील यावेळी म्हणाले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/537826576943824/