व्यक्तिमत्व घडविण्यासाठी चौफेर वाचनाची आवश्यकता – बापू शिरसाठ

WhatsApp Image 2020 01 09 at 6.54.47 PM

अनोरे, प्रतिनिधी | उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन महत्वाचे आहे. डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल , संगणकाएवढीच पुस्तकांशी मैत्री जमवायला हवी असे मत राज्य अभ्यासमंडळाचे सदस्य बापू शिरसाठ यांनी मांडले. येथील कै.ब.जी.महाजन विद्यालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर शाळेचे मुख्याध्यापक एम. एच. चौधरी, भास्कर महाजन, ए. के. पाटील, आदि उपस्थित होते.

शिरसाठ पुढे म्हणाले की, डिजिटल युगात पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटल पडद्यावरील वाचनापेक्षा छापील मजकुर अधिक लक्षात राहतो म्हणून वाचन महत्वाचे असल्याचे सांगितले. मराठी भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शाळा राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा त्यांनी केली. यानिमित्त इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शब्दांची व्युत्पत्ती , परीक्षा स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, मूल्यमापन तसेच मराठीच्या विकासासाठी सर्व प्रकारची चर्चा केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एम. एच. चौधरी यांनी परिणामकारक अध्ययनासाठी थोड्या वेळात नेमके व जास्तीत जास्त वाचता येणे महत्वाचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी तर आभार आर. बी. महाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतरांनी कामकाज पहिले.

Protected Content