मुंबई प्रतिनिधी । खडसे यांना सध्या कोणतेही काम उरलेले नसून नवीन पक्षात गेल्यानंतर आपण काही तरी करतोय हे दाखविण्याची त्यांची धडपड असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेचा घोटाळा हा अकराशे कोटी रूपयांचा असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच यात त्यांनी काही नेते अडकले असल्याचेही सूचकपणे सांगितले आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुनील झंवर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याने खडसेंनी ही प्रकरण जोरदारपणे लाऊन धरल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, बीएचआर प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य करत खडसेंवर टीका केली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करून त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. यात दरेकर यांनी म्हटले आहे की, मला वाटतं खडसेंना सध्या कामही नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर आपण भाजपवर आरोप करतोय आणि काही प्रकरणे उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी एकनाथ खडसे धडपड करत आहेत! असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरेकर यांनी पुढे म्हटलं की, जी गोष्ट चौकशीत आहे त्यावर निष्कर्ष येईल. मला खडसेंना विचारायचं आहे, राज्य सरकारी बँकेने कारखाने जे लिलावात काढले आहेत, ५०० कोटींचे कारखाने १० ते १५ कोटींना विकले. त्याची चौकशी करा. बुलडाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक असेल अख्ख्या बँकाच्या बँका डुबवल्या आहेत. राज्य सरकारी बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलं आहे, जिथं केवळ जागा आहे प्रकल्प देखील नाही. अशा प्रकल्पांना कर्ज दिलं आहे. मला वाटतं राज्यातील सर्व बँका, पतसंस्था कुठल्याही पक्षाच्या असू द्या ज्यांंचे ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांची एकादाच काय ते सर्व चौकशी लावा आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊ द्या असे आव्हान दरेकर यांनी एकनाथराव खडसे यांना दिले आहे.
खालील ट्विटमध्ये पहा प्रवीण दरेकर नेमके काय म्हणालेत ते ?
राष्ट्रवादीत गेल्यानंतर आपण भाजपवर आरोप करतोय आणि काही प्रकरणे उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी एकनाथ खडसे साहेब धडपड करतायत! @EknathGKhadse @BJP4Maharashtra pic.twitter.com/rCvvAPVBhR
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 1, 2020