Home उद्योग जळगाव जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देणार; ई-निविदा प्रक्रिया सुरू

जळगाव जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देणार; ई-निविदा प्रक्रिया सुरू


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायात स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध होत असून, जिल्ह्यातील आठ मोठ्या तलावांची मासेमारीसाठी ठेक्याने देण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले हे तलाव आगामी पाच वर्षांसाठी व्यावसायिक मासेमारीसाठी खुल्या निविदेद्वारे दिले जाणार आहेत.

२०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी आठ तलाव मासेमारीच्या ठेक्याने देण्यात येणार आहेत. या तलावांमध्ये मोर (९६.०० हेक्टर), को.प. बंधारा (४४.९७ हेक्टर), शहापूर (४७.०० हेक्टर), खडकेसिम (३०.०० हेक्टर), लोणीसिम (३५.३६ हेक्टर), शेळावे (२७.०० हेक्टर), दहिगाव बंधारा (२३९.०० हेक्टर) आणि शिरसमणी (७३.०० हेक्टर) यांचा समावेश आहे. एकूण ५९२ हेक्टर क्षेत्रफळाच्या या जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी उद्योगास संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रक्रियेसाठी http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आणि अटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मच्छीमार, खाजगी उद्योजक तसेच वैयक्तिक व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने ई-निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक मच्छीमार, उद्योजक आणि सहकारी संस्थांना जलसंपत्तीचा परिणामकारक वापर करत आर्थिक उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), अ.रा. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, इच्छुकांनी संधीचं सोनं करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने हा ठेक्याचा व्यवहार होणार असल्यामुळे इच्छुकांनी वेळेत आपली ई-निविदा सादर करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound