
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर २०११ मध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तब्बल आठ वर्षानंतर अटक केली आहे. आरोपी हरविंदर सिंगला (उर्फ अरविंदर सिंह) पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली.
2011 मध्ये पवारांना चपराक लगावल्यानंतर तो धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या तयारीत होता. दिल्लीतील कोर्टाने हरविंदरला 2014 मध्ये गुन्हेगार घोषित केले होते. दरम्यानच्या काळात अरविंदर फरार झाला होता. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या हरविंदरने महागाई आणि भ्रष्टाचाराला वैतागून तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नियोजनपूर्वक हल्ला केल्याची कबुली दिली होती. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्याला शरद पवारांपासून दूर ढकलले होते. त्यामुळे सुदैवाने पवारांना गंभीर दुखापत झाली नव्हती.