नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय क्रिकेट विश्वाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांना प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठा झटका दिला आहे. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग साइटशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दोन्ही खेळाडूंच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशानुसार, ही कारवाई प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे.
ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, शिखर धवन यांच्या नावावर असलेली ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तर सुरेश रैना यांच्या ६.६४ कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर जप्ती करण्यात आली आहे. तपासात असे उघड झाले आहे की, या दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी 1xBet आणि त्याच्याशी संबंधित अन्य विदेशी ऑनलाइन बेटिंग साइट्सच्या प्रचारासाठी करार केला होता, ज्यामध्ये परदेशी आर्थिक व्यवहारांचा समावेश होता.

ईडीच्या तपासानुसार, रैना आणि धवन यांनी या कंपन्यांसोबत जाहिरातींसाठी करार करून विदेशी चलन व्यवहाराद्वारे आर्थिक लाभ मिळवला, जो भारतीय कायद्याच्या विरुद्ध आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही खेळाडूंनी संबंधित वेबसाइट्सच्या प्रचाराद्वारे देशात ऑनलाइन सट्टेबाजीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.
या प्रकरणाचा उगम काही महिन्यांपूर्वी झाला, जेव्हा 1xBet आणि संबंधित वेबसाइट्सविरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आले. या कंपन्यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून भारतात आपले प्रमोशन वाढवले होते. त्या पार्श्वभूमीवर ईडीने केलेल्या चौकशीत आता रैना आणि धवन यांच्या नावांचा समावेश झाल्याने या प्रकरणाने खेळविश्वात खळबळ उडवली आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत दोन्ही खेळाडूंना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. ईडीकडून या मालमत्तेच्या स्रोतांबाबत तसेच व्यवहारांच्या स्वरूपाबाबत तपशीलवार चौकशी केली जाणार आहे.



