मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केल्यानंतर आज खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने काल सकाळी सातच्या सुमारास ताब्यात घेतले. तर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुमारे साडेपंधरा तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, ईडीच्या अधिकार्यांनी केलेल्या छापेमारीत संजय राऊत यांच्या घरात साडे अकरा लाख रूपये आढळून आल्याचे वृत्त आहे. यातील दीड लाख रूपये आपले असून उर्वरित दहा लाख रूपयांच्या बंडलावर एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहण्यात आले असून ते जप्त करण्यात आलेले आहे. तर आज संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
याप्रसंगी ईडीच्या वकिलांनी संजय राऊत हे तपासात कोणतेही सहकार्य करत नसून त्यांना आठ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली. तर न्यायालयाने मात्र ही मागणी अमान्य करून त्यांना ४ ऑगस्ट पर्यंतची कोठडी सुनावली आहे.