उत्सुकता नवरात्रोत्सवाची : सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदीर परिसरात सोमवारपासून यात्रोत्सव !

नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  खान्देशवासीयांचे कुलदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी च्या नवरात्रोत्सवाला दि.१५ ऑक्टोबर रविवार पासुन प्रारंभ होत असुन यंदा सप्तमी व अष्टमीला शनिवार व रविवारची सुट्टीचा योगायोग येत असल्याने दोन दिवस मनुदेवीच्या चरणी लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला ही खबरदारी व उपाययोजना करावी लागणार असुन श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानला ही मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नियोजन व भाविकांच्या सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली व फैजपूर पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.  यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने यावल पो.नि.राकेश मानगावकर, यावल बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विकास करांडे, वनविभागाचे वनपाल विपुल पाटील, मनुदेवी संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी , खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश पाटील,  नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनिल महाजन, चिंधु महाजन , भुषण चौधरी , योगेश पाटील  , चंदन वाणी , आडगाव सरपंच आमिना रसीद तडवी , तलाठी आर.के.गोरटे , यावल तालुका बांधकाम विभागाचे अभियंता , प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी , मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्रोत्सवात इतर आगारातील बसेस मागविणार भाविकांची गैरसोय होवु नये याकरीता यावल एस टी आगारातुन मनुदेवी नवरात्रोत्सवात मंदिरात दर्शना साठी जाणे येण्यासाठी यावल ते मनुदेवी,चिंचोली ते मनुदेवी तसेच मानापुरी ते मनुदेवी मंदिर यासाठी आगारातुन २० ते २५ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक विकास करांडे यांनी दिली. तसेच भाविकांची ऐनवेळी वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील इतर आगारातील बसेस देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यावल आगारातील काही बसेस यावल पासुन मनुदेवी पर्यंत गर्दी झाल्यास ये जा करतील.यासाठी यावल बस आगारातील अधिकारी व कर्मचारी मनुदेवी मानापुरी जवळ पार्किंग ठिकाणी हजर राहून लक्ष ठेवणार आहेत.

मानापुरी पार्किंग जागा ते मनुदेवी मंदिर फक्त बसेसने प्रवास

रविवार १५ रोजी घटस्थापनेपासुन ते १८ पर्यंत खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाणार आहेत. मात्र १९ ऑक्टोबर गुरुवारपासून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.  भाविकांची वाढती गर्दी पाहता ऐनवेळी मानापुरीजवळ असलेल्या संस्थानच्या पार्किंग जागेवर खासगी वाहनांना पार्किंग करून तेथुन पुढील चार कि.मी. पार्किंगची जागेपासून पुढील प्रवास बसनेच करावा लागणार आहे.  नवरात्रोत्सावात नऊ दिवस यावल पोलीस स्टेशनच्या डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी यांच्या वतीने कायदा सुव्यवस्था राखण्याकामी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.   यासाठी मनुदेवी मंदिरातील स्वयंसेवक ही सहकार्य करणार आहेत.

‌ब-हाणपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत १२ कि मी.अंतरावर खान्देश वासियांचे कुलदैवत मनुदेवी मातेचे हेमांडपंथी मंदिर आहे.मंदिराची स्थापना प्राचीन काळापासून करण्यात आली असून महामार्गावर असलेले चिंचोली गावापासून तीन कि. मी. अंतरावर उत्तरेला आडगाव कासारखेडा व तेथुन साधारणतः पाच ते सहा कि.मी.अंतरावर सातपुड्या च्या पायथ्याशी असलेले मानापुरी या आदिवासी गावापासून मनुदेवीचे मंदिर काही अंतरावर असुन मनुदेवी मातेचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम येथुनच माथा टेकवून पुढे ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रवास करतात.मंदिर परिसरात पोहचल्यावर जवळपास शंभर सव्वाशे पाय-या चढून मंदिरात जावे लागते.मंदिराच्या समोरच ९० ते १०० फुट उंचावरुन नयनरम्य असा धबधबा कोसळतो. श्रावण महिन्यात हा धबधबा एवढ्या‌ जोरदार सुरू असतो की मंदिराच्या पाय-या वर सुद्धा पाण्याचे फवारे येतात.गेल्या आठवडाभर सातपुड्याच्या परीसरात मुसळधार पाऊस झाल्याने मनुदेवी मंदिरा समोरील धबधबा आज ही नवरात्रोत्सवात सुरूवात होत आहे.

यात्रोत्सव श्रावण महिन्यात पिठोरी अमावास्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ,माघ महिन्यात , व आश्विन महिन्यात पहिल्या दिवसा पासून नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रौत्सवात दहा दिवस लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात नवरात्रोत्सावात खणा नारळाची व खेळ खेळण्याची तसेच फराळाची मोठी दुकाने या ठिकाणी लावली जातात दहा दिवस लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी  होत असते.

संपुर्ण नवरात्र च्या निमित्ताने आयोजीत होणारे यात्रात्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील , सचिव निळकंठ चौधरी ,खजिनदार सोपान वाणी , विश्वस्त  चिंधु महाजन,सतीश पाटील ,सुनील महाजन,भुषण चौधरी , योगेश पाटील ,चंदन वाणी, ज्ञानेश्वर पाटील ,नितीन पाटील आदि विश्वस्तासह मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक पाडण्यासाठी परिश्रम घेतात.

Protected Content