जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील लघुउद्योजक आणि रस्त्यावरील दुकानदार (हॉकर्स) यांच्यासाठी जळगावात एक अभिनव आणि परिवर्तन घडवणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. मराठी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत १०० हॉकर्सना चालते-फिरते ई-रिक्षा स्वरूपात दुकाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांना स्वाभिमानाने, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने व्यवसाय करता येणार असून शहरही अतिक्रमणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
“श्रम कमी, जास्त उत्पन्न” या तत्त्वावर आधारित हा उपक्रम भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, लस्सी व आईस्क्रीम विक्रेते, पाणीपुरी विक्रेते, पाणी जार व कटलरी विक्रेते, ब्रेड-बटर विक्रेते, पुष्पगुच्छ विक्रेते अशा असंघटित व्यावसायिकांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. अवघ्या ५० रुपयांमध्ये दिवसभर शहरात फिरून व्यवसाय करता येईल, अशी यंत्रणा या उपक्रमातून उभारली जाणार आहे. अरुंद गल्लीबोळांमध्ये सहज प्रवेश मिळत असल्यामुळे विक्रीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

या उपक्रमाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातून अतिक्रमण हटविण्याची दिशा. फुटपाथ व रस्त्यांवरील दुकानांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, सार्वजनिक सौंदर्यावर परिणाम होतो आणि नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होते. ई-रिक्षा स्वरूपात चालते-फिरते दुकाने ही समस्या कमी करतील आणि शहर अधिक स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आकर्षक बनेल.
या ई-रिक्षा इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणपूरक असून, प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याशिवाय, शासकीय अनुदान आणि बँकांमार्फत अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मराठी प्रतिष्ठानतर्फे आवश्यक पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे अल्प गुंतवणुकीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, “हॉकर्सच्या आर्थिक प्रगतीसोबतच शहराची स्वच्छता, शिस्त आणि सुसंस्कृतीकरण या तिन्ही बाबी साध्य होणे गरजेचे आहे. ई-रिक्षा उपक्रम ही काळाची गरज आहे आणि शहरहितासाठी आम्ही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.”



