मुंबई । महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक राहणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून ई-पासबद्दलचा निर्णय घेऊ, अशी माहिती देशमुखांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर देशमुखांनी नवीन ट्विट केलं. यात त्यांनी म्हटले आहे की, मिशन बिगिन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल. त्यामुळे ई-पाससह सध्या लागू असलेले सर्व नियम कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असेल.
केंद्र सरकारनं कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. राज्य शासनानं काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना (महापालिका, नगरपालिका आदी) तेथील परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर, गृहमंत्री यांनी तूर्तास खासगी वाहनांना ई-पास कायम राहण्याची केलेली घोषणा महत्वाची मानली जात आहे.