जळगाव प्रतिनिधी । पासपोर्ट मिळतांना येणार्या अडचणी सुलभ करुन भारतात ३५०पेक्षा अधिक पासपोर्ट केंद्र स्थापन करुन ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ या नावाने लोकप्रिय झालेले सिध्दहस्त लेखक तथा विचारवंत परराष्ट्र विभागातील माजी परराष्ट्र सचिव सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य असलेले ज्ञानेश्वर मुळे दिनांक १ मे रोजी जळगावातील दीपस्तंभ संस्थेने आयोजीत केलेल्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत.
ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘माती,पंख आणि आकाश’ या आत्मचरित्रातून महाराष्ट्रातील युवा पिढीला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळालेला आहे. सदर पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा्त समाविष्ठ आहे. मुळे यांच्या कडे जपान, अमेरीका,मालदीव, मॉरीशस आदी देशांमध्ये राजदूत व वाणिज्यदूत म्हणून काम केल्याचा विशाल अनुभव आहे. ते १ मे रोजी जळगावात दीपस्तंभ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेतील विजयी तसेच मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विजयी आणि पालकांचा गौरव समारंभासाठी येत आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलिस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी युपीएससीतील यशस्वी विद्यार्थ्यांची मनोगते पण ऐकायला मिळणार आहेत. संबंधीत कार्यक्रम दि १ मे,२०१९ रोजी ९.३० वाजता कांताई सभागृह, नवीन बस स्टँड मागे, जळगाव येथे आयोजीत केलेला आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे यजुवेंद्र महाजन यांनी केले आहे.