ब्रुसेल्स-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट हे जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना नाटोचे सरचिटणीस असतील. सरचिटणीसपदाच्या शर्यतीत त्यांची स्पर्धा रोमानियाचे पंतप्रधान क्लॉस इओहानिस यांच्याशी होती. मात्र, गेल्या आठवड्यातच त्यांनी नाव मागे घेतले होते. त्यानंतर मार्क रूट यांचा सरचिटणीस होण्याचा मार्ग मोकळा झाला. मार्क रुट यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.
रशिया-युक्रेन युद्धासारखे मोठे आव्हान या संघटनेसमोर असताना ते नाटोचे सरचिटणीस बनणार आहेत. रूट यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ते आउटगोइंग सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांची जागा घेतील. स्टोल्टनबर्ग यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. मार्क रुट यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी बुधवारी अभिनंदनही केले.