विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आठवडयातून दोन दिवसच प्रवेश देण्यात येईल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अधिवेशन काळात विधान भवनाचे दरवाजे हे सर्व सामान्यांसाठी खुले होते. कार्यकर्ते पदाधिकारी सर्रासपणे विधान भवन परिसरात दिसत होते. पण आता या सर्वांसाठी हे दरवाजे बंद होणार आहेत. तसा निर्णय सरकारने घेतला आहे. अधिवेशन काळात कधीही आणि कोणालाही आता प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र आठवड्यातून दोन दिवस प्रवेश देण्यात येईल. ते वार कोणते असतील त्याचीही घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिवेशन मुंबई आणि नागपूर येथे होत असते. या काळात मोठ्या प्रमाणात लोक विधानभवनात येत असतात. मात्र यामुळे विधान भवनाच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. हा ताण कमी व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधिवेशन काळात सरसकट सर्वांना प्रवेश दिला जाणार नाही. मंगळवार आणि गुरूवारी या दोन दिवस अधिवेशन काळात विधान भवनात सर्व सामान्यांना प्रवेश दिला जाईल. बाकीच्या दिवशी विधान भवनाचे दार बंद राहणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली. याबाबत वारंवार मागणी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत होता. शिवाय विधीमंडळाच्या व्यवस्थापनावरही ताम पडत होता. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला गेल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. या घोषणेमुळे विधान भवनात अधिवेशन काळात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अधिवेशन काळात नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बरोबरच सर्व सामान्य कार्यकर्तेही मोठ्या संख्येने येत असतात. त्याला आता कुठेतरी पायबंद बसणार आहे.

Protected Content