पायरेक्सीया क्रिकेट स्पर्धेत डियुपीएमसी संघ विजयी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पायरेक्सीया क्रिकेट लीग स्पर्धेत यजमान डियुपीएमसी संघाने बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात बार्शी येथील नर्सिंग महाविद्यालयाचा ६ गडी राखून पराभव करत डियुपीएमसी संघाने विजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवण्यात आली, ज्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह व जोश अनुभवायला मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत ४० संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात डियुपीएमसी संघाने दमदार कामगिरी करत बार्शी नर्सिंग महाविद्यालयाचा ६ गडी राखून पराभव केला आणि पायरेक्सीया चषकावर आपले नाव कोरले. बार्शीचा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष गौरवण्यात आले. यश पाटील याला उत्कृष्ट गोलंदाज तर चेतन पाटील याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते, ज्यामुळे हजारो क्रिकेटप्रेमींनी घरबसल्या सामन्याचा आनंद घेतला. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, संघभावना आणि खेळातील कौशल्य यांचा सुंदर संगम घडवला. डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाने उत्तम नियोजन आणि यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Protected Content