जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी गावाच्या फाट्याजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर तालुका पोलीसांनी कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी रविवारी १६ जुलै रोजी पहाटे ४ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्याने पोलीसांकडून रात्रीच्या वेळी गस्त लावण्यात आलेले आहे. रविवारी १६ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील खेडी गावाजवळील फाट्याजवळ पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना विना क्रमांकाचे डंपर आढळून आले. पोलीसांनी डंपर आडवून तपासणी केली असता वाळूने भरलेले दिसून आले. वाळू वाहतूकी बाबत परवाना विचारला असता कोणताही परवाना आढळून आला नाही. म्हणून पोलीसांनी वाळूने भरलेला डंपर जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अजय ज्ञानेश्वर सपकाळे (वय-२६) रा. खेडी खुर्द ता.जि.जळगाव आणि नाव गाव माहित नसलेले डंपर मालक यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.