धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांभोरी गावानजीकच्या केबीएक्स कंपनी परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर शुक्रवारी रात्री कारवाई करत वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी शनिवारी धरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक मयूर दिनकर पाटील वय २५ रा. साकेगाव ता. भुसावळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वैजनाथ ते बांभोरी रस्त्यावरून बेकायदेशीरित्या गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा करून डंपरवरून वाहतूक होत असल्याची माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवार २९ मार्च रोजी रात्री १० वाजता बांभोरी गावानजीकच्या केबीक्स कंपनीजवळ सापळा रचला. त्यानंतर पोलीसांनी वाळू वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ००१०) याला अडविले. यावेळी चालक मयुर दिनकर पाटील याला वाळू वाहतूक करण्याबाबत परवाना दाखविण्याची मागणी केली. त्यावर डंपर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक मयुर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.