जामनेर, प्रतिनिधी | राज्यभरात ग्रामसेवकांनी कामबंद असहकार आंदोलन सुरू केले असून याचा परिणाम आता ग्रामपातळीवर जाणवायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे काही दाखले, रहिवासी दाखले, इतर कुठलीही कागदपत्रे व ठराव मिळत नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच काही गावांमध्ये सामाजिक अंकेषण सुरू असून त्यासाठीही ग्रामसेवकांची आवश्यकता असल्याने ती सुद्धा आता पूर्ण होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नुकतीच तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह ना.गिरीश महाजन यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी एकनाथ ढाकने, प्रशांत जामोदे, संजीव निकम, शरद पाटील, रवींद्र तायडे, डी.पी.तेमकर, हरी सावंत, विजय पाटील, अशोक पवार, डिंगबर पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. ना.महाजन यांनीही याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले होते, मात्र या आंदोलनाने मात्र ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अनेक कामांचा खोळंबा झाला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा तसेच ग्रामसभाही बंद पडल्या आहेत. तरी शासनाने सकारात्मक विचार करून काम बंद आंदोलन व सहकार आंदोलनावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे.