शिक्षक बदलीविरोधात उपोषणाला बसलेल्या पालकाची प्रकृती खालावली

6bf52c28 585b 4be9 8476 66ede0487c48

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कर्तव्यनिष्ठ आदर्श शिक्षक यांच्या राजकीय दबावतंत्र वापरून केलेल्या अन्यायकारक बदलीविरोधात आमरण उपोषणाला बसलेले पालक श्री. तडवी यांची प्रकृती उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खालावल्याचे त्यांच्या आरोग्य तपासणीतून निदर्शनास आले आहे.

या संदर्भात काल (दि.१५) महेलखेडी येथे राहणाऱ्या अनेक पालक आणि ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांची भेट घेवुन, महेलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ आदर्श असे आदिवासी शिक्षक हमीद फकीरा तडवी यांची बदली राजकीय दबावतंत्र वापरून जिल्हा परिषद सदस्य रवीन्द्र पाटील आणी महेलखेडी येथील ग्रामपंचायत सरपंच विलास भागवत पाटील यांनी संगनमताने केल्याची लेखी तक्रार निवेदन देवुन बदली रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच याच मागणीसाठी गावातील विद्यार्थी पालक रज्जाक कालु तडवी यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आज (दि.१६) तडवी यांच्या उपोषणास्थळी माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. माधुरी किशोर पाटील आदिवासी समाजातील जेष्ठ समाजसेवक आमद बु्न्हाण तडवी, आदी मान्यवरांनी उपोषणास्थळी भेट देवुन आपला पाठींबा दर्शविला आहे.

यावल पंचायत समिती चे गट शिक्षण अधिकारी एजाज शेख व के.सी. सपकाळे यांनी उपोषणकर्ते रज्जाक तडवी यांची भेट घेवुन प्रशासनाची भुमिका मांडली, आज सायंकाळी ७.०० वाजता रज्जाक तडवी यांच्या कुटुंबानेही त्यांची भेट घेतली. रज्जाक तडवी यांची येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी महाजन यांनी उपोषणास्थळी तपासणी केली असता त्यांची प्रकृती खालावली असुन दोन किलो वजन कमी झाल्याची माहीती समोर आली आहे.

Protected Content