चित्तोडगढ, वृत्तसंस्था | राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. परिणामी राणा प्रताप सागर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला आहे. येथील एका शाळेत शनिवारी अचानक पुराचे हे पाणी शिरले, तेव्हा शाळेत ३५० विद्यार्थी आणि ५० शिक्षक होते. रस्ते बंद झाले आणि हे सर्वजण २४ तास शाळेतच अडकून पडले. स्थानिक लोक या विद्यार्थी-शिक्षकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत.
राजस्थानात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेजारच्या मध्य प्रदेशातही पावसाची संततधार सुरूच आहे. तेथेही सीमाभागात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. चित्तोडगडच्या या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. प्रशासनाचे बचावकार्य सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना शाळेतच थांबण्यास सांगण्यात आले आहे.