मुक्ताईनगरातून अशोक कांडेलकरांना उमेदवारी द्या- कोळी समाज संघटनेची मागणी

koli samaj meeting

जळगाव प्रतिनिधी । भाजपतर्फे मुक्ताईनगरातून अशोक कांडेलकर यांना तिकिट देण्यात यावे अशी मागणी आज कोळी समाजाच्या बैठकीत करण्यात आली. यासोबत अन्य मतदारसंघात समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यात यावे अन्यथा समाज युतीला धडा शिकवणार असल्याचा इशारादेखील याप्रसंगी देण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी समाजांची एकत्रीत बैठक जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात घेण्यात आली. समाजातर्फे आगामी राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी बैठक घेण्यात आली. याला सेवानिवृत्त शिक्षण संचालक श्रीधर साळुंखे, विधी व न्याय विभागाचे सेवानिवृत्त उपसचिव हरीभाऊ सपकाळ, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भा.ना. सैंदाणे, सेवानिवृत्त मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, सेवानिवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे आणि अ‍ॅड. वसंत भोलाणकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत सरकार दरबारी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

यात नमूद करण्यात आले आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या सभेत कोळी समाजाच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनीही असेच वचन दिले होते. मात्र समाजाच्या अडचणी दुर झालेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमिवर, जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. तसेच मराठा व धनगर समाजाप्रमाणे कोळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे व जळगावला जात पडताळणी कार्यालय व्हावे या मागण्या करण्यात आल्या. कोळी समाजाने आजवर युतीला भरभरून मतदान केल्यामुळे शिवसेना व भाजपतर्फे समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. विशेष म्हणजे मुक्ताईनगर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चोपड्यातून विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणीदेखील करण्यात आली. याशिवाय, जळगावातून श्रीधर साळुंखे, रावेर-यावलमधून बी.टी. बाविस्कर, जळगाव ग्रामीण प्रभाकर गोटू सोनवणे, अमळनेर-भागवत सैंदाणे, पारोळा-प्रा. विश्‍वास कोळी व चाळीसगाव येथून अण्णा कोळी हेदेखील इच्छुक असल्याने या मान्यवरांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.

या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर कोळी समाज सरकारला हिसका दाखविणार असल्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला.

Protected Content