
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून भागातील अक्सानगर आणि नशेमन कॉलनी परिसरात लहान मुलांचे भांडण झाल्याच्या कारणावरून दोन गटात शिवीगाळ व मारहाण करून एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पहिल्या घटनेत, रहिमोद्दीन चिरागोद्दिन शेख (वय-६५, रा. नशेमन कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ते घरी असताना लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून रमजान मुलतानी, अश्रफ मुलतानी, अर्षद मुलतानी, माजीद मुलतानी आणि त्यांच्यासोबत १० ते १२ अनोळखी व्यक्ती (सर्व रा. मेहरूण, जळगाव) यांनी त्यांच्या घरी येऊन रहिमोद्दीन चिरागोद्दिन शेख यांची पत्नी अल्लापल्लीबी, त्यांचा मुलगा शरीफ आणि सून तस्मिन या सर्वांना बेदम मारहाण करून अश्लील शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या घटनेत, हिना अफरीन शाहरुख खान (वय-२६, रा. अक्सा नगर, मेहरूण, जळगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून रहिमोद्दीन चिरागोद्दिन शेख, त्यांचा भाऊ शरीफ शेख, पत्नी अल्लापल्लीबी शेख, तस्लीमबी शेख आणि त्यांच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. नशेमन कॉलनी, जळगाव) यांनी शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत परस्पर विरोधात दोन्ही गटातील सदस्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहेत.


